विदेशी आली अन् गडबड झाली!

Foto
औरंगाबाद : सध्या कोरोना या  जीवघेण्या आजाराची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. विशेषत: विदेशात या आजाराचा प्रादुर्भाव अधिक असल्याने पर्यटना निमित्त शहरात आलेल्या विदेशी व्यक्तींपासून नागरिक चार हात दूरच राहत आहेत. आज मंगळवारी एक विदेशी महिला आपल्या मुलासह  मास्क विना मनपात दाखल झाली. यानंतर मनपात काही वेळ एकच धावपळ उडाल्याचा प्रकार घडला.
 शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. विदेशात या आजाराचा प्रादुर्भाव अधिक असल्याने पर्यटना निमित्त किंवा इतर कामाकरिता शहरात आलेल्या विदेशी व्यक्तींपासून स्थानिक नागरिक चार हात लांबच थांबत आहे. दरम्यान  मनपा मुख्यालयात आज मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक विदेशी महिला आपल्या लहान मुलासह दाखल झाली. ही महिला चारचाकी वाहनातून आल्याने पार्किंग मध्ये गाडी लावताक्षणी सुरक्षा रक्षकांची नजर या महिलेवर पडली. त्यानंतर हातात थर्मल गन घेऊन सुरक्षारक्षक धावत पळत सुटला. अचानक धावपळ का सुरू झाली कुणाला काहीच कळाले नाही. यानंतर महिलेसोबत असलेल्या एका भारतीय व्यक्तीने आपण झारखंड येथून आलो आहोत. सदरील महिला लंडन येथून आली असून, आम्ही आयुक्तांच्या भेटीला चाललो आहोत असे  सांगितले. यानंतर जवळच असलेल्या उपायुक्त रवींद्र निकम यांनी सुरक्षा रक्षकांना या महिलेचे व मुलाचे थर्मल स्क्रीनिंग करायला सांगितले. स्क्रीनिंग नॉर्मल आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर ही महिला आयुक्त दालनाकडे गेली.